[ राजापूर / प्रतिनिधी ]
आपल्या जगाची सुरुवात ही स्वतःपासूनच झाली पाहिजे ,स्वतःला कधीच कमी लेखू नका स्वतःचा कायम आदर करा असे प्रतिपादन पत्रकार विनोद पवार यांनी राजापूर तालुक्यातील निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या युवक सप्ताहाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राजापूर शाखेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने तालुक्यातील निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये येथे व्यावसाय मार्गदर्शन या विषयीचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते. कोकणातील व्यावसायाच्या संधी या विषयावर पत्रकार विनोद पवार यानी विद्यार्थ्याना संबोधीत केले. आजची आपली शिक्षण पध्दती ही नोकर मानसिकतेला खतपाणी घालणारी आहे मात्र आज नोकरीच्या संधी फार कमी आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यानी भविष्यात स्वतःच्या व्यावसायाकडे वळले पाहिजे. जर भविष्यात व्यावसाय निवडायचा असेल तर त्याची तयारी आतापासुनच करायला हवी असे आवाहन यावेळी विनोद पवार यानी बोलताना केले. मुळात व्यावसाय करायला कधीही पैशांची गरज लागत नाही तर त्यासाठी आपली इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी व प्रामाणिकपणा या त्रिसुत्रीची नितांत गरज असल्याचे मत त्यानी बोलताना मांडले.
कोकणातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून आपण वेगवेगळे व्यावसाय करु शकतो. मुळात कोकणात शेतीतूनच मोठ्या प्रमाणावर व्यावसायाच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र आज आपण पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे नोकरीसाठी जात आहोत. आपली ही माणसिकता आता बदलण्याची नितांत गरज असल्याचे मतही यावेळी विनोद पवार यानी बोलताना मांडले.
विद्यार्थी दशेतच आपण आपल्या जिवनाची ध्येय ठरवायला हवीत. आज आपल्याकडे पर्यटन, शेती पुरक व्यावसायाच्या खुप संधी आहेत त्याचा फायदा आपण घ्यायला हवा. सुमारे सहाशे वर्ष परकीय आक्रमनांच्या काळात आपल्या देशात मुघल, डच, फ्रेंच , इंग्रज हे केवळ व्यापारी म्हणून आले. इथे येवून त्यानी आपल्याच वस्तू बाहेर नेवून विकल्या आणि आपल्यावर राज्य केले मात्र आपली साधनसंपती आपल्याला कधीच दिसली नाही. त्यामुळे भविष्यात आपल्या कोकणातील परिस्थिती बदलण्यासाठी आपण आतापासुनच प्रयत्न करायला हवेत असे मत यावेळी बोलताना पत्रकार विनोद पवार यानी मांडले.
व्यावसायिक मार्गदर्शन करताना अनेक विषयाना त्यानी स्पर्ष केला व दहावी बारावी नंतर काय असा प्रश्न आपल्याला कधीच पडू नये यासाठी आपण काय केले पाहिजे हे विद्यार्थ्याना स्पष्ट करुन सांगितले. या कार्यक्रमाला निर्मला भिडे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण कुराडे, शिक्षिका श्रीम उल्का वाघाटे, शिक्षक भीमराव साळे, समीर तावडे संदेश ठाकुरदेसाई, चुनिलाल राऊत, संतोष जुवळे, श्रीम स्नेहा देसाई, सौ स्वाती नाईक, ज्ञानेश्वर शिंदे, बापू मोटे सौ भक्ती मेजारी आदी मान्यवर उपस्थित होते.