(मुंबई)
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा. राज्यात 25 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा होणार असून, लोकसहभागातून ती यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे 1 ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या अभियानासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-2चा शुभारंभ केला. महाराष्ट्र स्वच्छ असावा, हे आपले उद्दिष्ट आहे. स्वच्छतेच्या मंत्राची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. संपूर्ण राज्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून, त्यासाठी त्याचे नियोजन करा.
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरच्या भागात नेहमी कचर्याचे ढीग असतात. अशा हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकार्यांनी स्वच्छता मोहीम राबवावी. त्यासाठी मुख्य सचिवांनी आढावा घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान महत्त्वाचे आहे. स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ राबविण्यात येणार असून लोकसहभागातून त्या स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
स्वच्छता फक्त कागदावर ठेवू नका. प्रत्यक्षात त्याचे काम दिसले पाहिजे. या उपक्रमात आपण 1 ऑक्टोबरला आपापल्या गावात, शहरात, प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक क्षेत्रात सकाळी 10 वाजेपासून स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी आणि ग्रामपंचायतीत एका ठिकाणी मोहीम राबविताना त्या-त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे. जिथे खरोखरच कचरा आहे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे, अशा जागा शोधून काढा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.