(रत्नागिरी)
महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. राज्यातील सर्वोत्तम १०० यादीत मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, जि.प. प्राथमिक शाळा कुडळी नं.४, कै. पी.जी.कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर व श्री. आर. डी. पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर अशा चार शाळांचा समावेश आहे.
प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा व विद्यार्थी यांना स्वच्छता प्रकल्पात नेमके काय करायचे आहे हे समजण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा होता. ह्या प्रकल्पात विद्यार्थी हे स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणारे दूत नसून, कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून देऊन ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता. ६४ हजार शाळांच्या सहभागाची नोंदणी यात झाली होती. निष्काळजीपणे कचरा टाकणाऱ्यांना, बेफिकीरतेने थुंकणाऱ्यांना विद्यार्थी जागच्याजागी थांबवून झालेली चूक दाखवून सुधारण्याची संधी देत होते. विद्यार्थ्याने गांधीगिरी करून इतराने केलेला कचरा साफ करणे अपेक्षित नसून, लेट्स चेंज फिल्म मधील अस्वच्छता करणाऱ्यालाच सफाई करण्यास विनंती करणे, हे अपेक्षित आहे.
पहिल्याच टप्प्यात १५ लाखाहून अधिक व्हिडिओ शेअर झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या अस्वच्छतेला, चुकीला कोणी ना कोणी दाखवून दिले, तर समाजातील सर्वजण जागृत राहतील आणि आपला परिसर, गाव, जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य निष्काळजी मुक्त बनेल, अशी अपेक्षा प्रकल्प संचालक रोहित आर्य यांनी व्यक्त केली.
पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केले जाणार आहे. त्याचबरोबर निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर आयडेंटीटी कार्डने गौरवण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुवर्णा सावंत, गटशिक्षणाधिकारी रत्नागिरी प्रेरणा शिंदे, तालुका समन्वयक व पीएलसी स्वच्छता मॉनिटर समन्वयक अश्विनी काणे यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले.
मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज शाळेच्या मुख्याध्यापिका विभावरी जोईल यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले, शाळा समन्वयक हर्षदा शिऊडकर आणि सर्व शिक्षकांनी नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ नवी मुंबई, पनवेल या संस्थेचे अध्यक्ष, धनराज विसपुते आणि सचिव संगीता विसपुते व शाळेच्या संचालक नंदा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.