( रत्नागिरी )
स्मृतीभ्रंश हा फक्त अनुवांशिक व वयोमानानुसार होणारा आजार नसून तो जीवनशैलीमुळे पण होणारा आजार आहे, त्यामुळे जीवनशैलीत बदल करून नियमीत व्यायाम, संतुलीत आहार, नियमीत झोप, हृदयाची व रक्तवाहिन्यांची काळजी, ताण तणावाचे नियंत्रण, मेंदू तल्लख ठेवणे व समाजात मिसळणे या सप्तसूत्रीचा वापर केल्यास स्मृतीभ्रंश हा मानसिक आजार टाळता येऊ शकतो; किंवा ज्यांच्यामध्ये तो झाला आहे त्यांच्यामध्ये त्याच्या प्रगतीचा वेग कमी करता येऊ शकतो असे रत्नागिरीच्या प्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ अतुल ढगे यांनी सांगितले. कोल्हापूर मधील जेष्ठ नागरिकाच्या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाची कोल्हापूर शाखा, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे शहाजी लॉ कॉलेज येथे ज्येष्ठांसाठी शिबिर झाले. येथे हाडांचा ठिसूळपणाही तपासणी मोफत केली. प्रमुख पाहुणे रत्नागिरीतील मनोविकारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक जोशी यांची व्याख्याने झाली. कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याच विषयाशी निगडित ‘पडणे’ व ‘विसरणे’ अनुसरून मार्मिक नाट्य सादर केले.
जेरियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. गीता पिलाई यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. शिबिरास अडीचेशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शिबिरास संघटनेचे डॉ. संजय घोटणे, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. उद्यम व्होरा, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. रेखा जोशी, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. ए. बी. पाटील उपस्थित होते. डॉ. महावीर मिठारी यांनी संयोजन केले. डॉ. मनीषा बागवडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अरुण धुमाळे यांनी आभार मानले.