(संगमेश्वर / प्रतिनिधी )
कलाकाराने काम कोणत्याही माध्यमात केले तरी , वस्तू चित्र आणि स्थिर चित्र यामध्ये फरक आहे . स्थिर चित्रात वस्तूंच्या निवडीसह , आकारमान , रेखाटन आणि छायाप्रकाश याला असणारे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत कोल्हापूर येथील प्रसिध्द चित्रकार संजय शेलार यांनी व्यक्त केले .
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी , जे . एस. डब्लू फाऊंडेशन जयगड आणि रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांची कला कार्यशाळा आणि कृतीसत्र जयगड येथे जे एस डब्ल्यूच्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मध्ये संपन्न झाले . यामध्ये दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कोल्हापूर येथील प्रसिध्द चित्रकार संजय शेलार यांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रात्यक्षिका दरम्यान कलाध्यापकांजवळ संवाद साधताना चित्रकार शेलार हे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर कलाध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमतियाज शेख , सचिव राजन आयरे , रुपेश पंगेरकर , स्पर्धाप्रमुख सुशील कुंभार , पराग लघाटे , उदय मांडे , प्रथमेश विचारे आदि मान्यवर उपस्थित होते .
आपल्या प्रात्यक्षिका दरम्यान कलाध्यापकांना मार्गदर्शन करताना चित्रकार संजय शेलार म्हणाले की , कलाध्यापक शाळेत वस्तूचित्र शिकवत असतात आज आपण वस्तूचित्र आणि स्थिरचित्र यातील फरक प्रात्यक्षिका दरम्यान समजून घेणार आहोत . स्थिरचित्राच्या मांडणीला मोठे महत्व आहे . विविध वस्तू मांडणी करण्यासाठी निवडत असताना त्यामध्ये कमी अधिक उंची , विविध रंग येणे अपेक्षित असते . स्थिर चित्रात छायाप्रकाशाला सर्वाधिक महत्व असल्याने , मांडणी करताना त्याचा विचार आधी करणे गरजेचे असते . स्थिर चित्राच्या मांडणी नंतर प्रथम कॅनव्हासवर केले जाणारे रेखाटन चारही बाजूने योग्य पध्दतीने झाले आहे अथवा नाही , हे पहावे . प्रथम बाह्यरेषा आणि नंतर टप्प्याटप्प्याने रंगभरण करावे . एकावेळी तीन पेक्षा अधिक रंगांचे मिश्रण केल्यास रंग उठावशीर दिसत नाहीत त्यामुळे रंगमिश्रण अत्यंत काळजीपूर्वक करावे असेही शेलार यांनी सांगितले . जवळपास सलग दोन तास काम करुन संजय शेलार यांनी हुबेहूब स्थिरचित्र साकारताच उपस्थित कलाध्यापकांनी टाळ्यांच्या कडकडाट करुन शेलार यांचे अभिनंदन केले . प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण आपले चित्र उलट करुन न्याहाळले , तर काही त्रूटी राहिल्या असल्यास त्या समजतात असा तंत्रातील खास मंत्रही कलाध्यपकांना समजावून दिला .
पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीचे कलाशिक्षक रूपेश पंगेरकर यांनी स्थिर चित्रासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन चित्रकार संजय शेलार यांची सर्व व्यवस्था पाहिल्याबद्दल संघटनेने त्यांना खास धन्यवाद दिले . प्रात्यक्षिक समारोप प्रसंगी अध्यक्ष इमतियाज शेख यांनी चित्रकार संजय शेलार यांनी व्यस्त दिनक्रमातून जयगड येथे येवून कलाध्यापकांना मार्गदर्शन करत उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल त्यांना खास धन्यवाद देत ऋण व्यक्त केले .