(देवरुख)
स्थानिक प्रशासनाने उनाड गुरांचा तसेच मालकांचा शोध घेऊन त्वरित बंदोबस्त करावा अशी महाराष्ट्र समविचारी मंच संगमेश्वरची मागणी केली आहे. ‘देवरुख शहर स्वच्छ शहर’ या उक्ती प्रमाणे गेल्या दोन वर्षा पासून देवरुख मधील नागरीकांना उनाड गुरांचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधीत प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.
सुमारे 20 ते 25 उनाड गुरे रोज देवरुख शहरात फिरत आहेत. त्यामुळे बाजारपेठ मधील भाजी विक्रेते, वाहनधारक, ग्राहक व नागरिकही हैराण झाले आहेत. तसेच भाजी विक्रेत्यांच्या भाज्या फस्त करीत आहेत. उनाड गुरांचा मोठा कळप असल्याने रात्री रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत.
रात्रीचे वेळी काळोखात दिसत नसल्याने वाहनधारकांचा मोठा अपघात होण्याचा संभव जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उनाड गुरांचा बंदोबस्त करावा. तसेच सदर गुरांना वेसण असल्याने त्यांचे मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक यांना या बाबत निवेदन देण्यात येणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे.