(मुंबई)
एमसीएलआर रेटमध्ये वाढ झाल्यानंतर बँकेचे वाहन कर्ज, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. म्हणजे कर्ज घेतल्यानंतर आता अतिरिक्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, नवे दर १५ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
८ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात रेपो दरात पाव टक्का वाढ केली आहे. रेपो रेट दरवाढीनंतर देशातील अनेक मोठ्या खाजगी आणि सरकारी बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. देशातील सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनेही त्यांच्या मार्जिनल काॅस्ट आँफ फंड बेस्ड लेडिंग रेट्समध्ये १० बेसिस पाँईंट्सनी (एमसीएलआर) वाढ केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या कालावधीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या किमान १ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर पाव टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे. बँकांच्या वतीने कर्जे महाग करण्याबरोबरच ठेवीवरील व्याजदरातही वाढ करण्यात येत आहे. यापूर्वी एसबीआयने १३ डिसेंबर २०२२ रोजी एफडीवरील व्याजदर वाढवले होते.