(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या सर्व चर्चा आणि तर्कवितर्क आता खुद्द अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत. ‘जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. हे आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ,’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पत्रकारांना केला.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मी अधूनमधून विधानभवनात बसतो. त्यावेळी अनेक आमदार, मंत्री भेटत असतात. काही कामं असतात. ही कामाची नेहमीची पद्धत आहे, त्यात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं अजितदादा म्हणाले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरू आहे. या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या वगैरे घेतल्याच्या बातम्या साफ खोट्या आहेत. आम्ही सगळे राष्ट्रवादीचेच आहोत, तिथंच राहणार आहोत, प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ अशी वेळ तुम्ही माझ्यावर आणली आहे. हे बरोबर नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘ध’ चा ‘मा’ करू नका. काही ठरलं असेल तर मीच आधी सांगेन. तुम्हाला कुठूनही बातम्या काढण्याची गरज नाही. काही ईतर पक्षातील काही लोकही आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम करत आहेत. माझ्या पक्षात माझ्याविषयी आकस असलेलं कुणी नाही, ते बाहेरचे आहेत. पण आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूरच्या सभेत भाषण न केल्यावरून अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, तिथं कोणी बोलायचं ते आधीच ठरलं होतं. त्यानुसार मी नागपुरात बोललो नाही. बोलणाऱ्याची बातमी देण्याऐवजी अजित पवार बोलले नाहीत, ही मुख्य बातमी झाली. एवढं का प्रेम ऊतू चाललंय, हे सर्व राजकारण का होतंय मला कळत नाही, असे सांगून त्यांनी आपल्यावरच संशयाचे धुक दूर केलं.