(संगमेश्वर)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड- २०२३’ ने मुंबई महानगरीय प्रदेश विकास संस्थेच्या मैदानावर ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम एज्युकेशन सप्लाय फ्रॅंचाईजी या अशासकीय संस्थेने आयोजित केला होता. महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग यामध्ये सह-आयोजक होता. सदर सोहळ्यामध्ये उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट संस्थाचालक, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्रशाला इत्यादी अनेक पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर निर्धारित निकष पूर्ण करणारे शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय इत्यादींना सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दक्षिण भारतातील राज्यांमधून आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा व शैक्षणिक आस्थापनांचा सन्मान करण्यात आला.
स्वायत्त वरिष्ठ महाविद्यालय प्रवर्गातून संपूर्ण भारतातून फक्त पाच महाविद्यालयांची निवड करण्यात आली. यामध्ये आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख हे कोकणातील एकमेव महाविद्यालय आहे. सदर पुरस्कारांचे वितरण वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. महाविद्यालयाला मिळालेल्या या पुरस्कारासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.