(मुंबई)
सेक्सटॉर्शनच्या नावाखाली मागण्यात येणा-या खंडणीमुळे अनेकजण खचून उद्ध्वस्त होत आहेत. या सेक्सटॉर्शनमुळे अनेकजणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पीडित व्यक्तींना आता मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सेक्सटॉर्शन खंडणीचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच पोलिस सेक्सटॉर्शन पीडितांचे समुपदेशनही करणार आहेत.
एका अनोळखी नंबरवरून व्हीडिओ कॉल आल्यावर एक महिला अर्धनग्न अथवा नग्नावस्थेत काही वेळेसाठी स्क्रीनवर दिसते. हा व्हीडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. हा रेकॉर्ड झालेला व्हीडिओ कॉल व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितांना धमकावून पैसे उकळले जातात. काहीजण इभ्रतीचा प्रश्न म्हणून खंडणीची रक्कम देतात, तर काही जणांकडून खंडणी मागणारा फोन क्रमांक ब्लॉक केला जातो.
हा प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, अनेकजण आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. अनेकदा सेक्सटॉर्शनची धमकी गांभीर्याने घेणा-या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अशा व्यक्ती सातत्याने तणावाखाली असतात. त्या व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळतात आणि एकलकोंडे होतात. यातून काहीजण आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता थेट सायबर विभागाचे पोलिस सरसावले आहेत. त्यामुळे आता सेक्सटॉर्शन पीडितांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
राज्यात सेक्सटॉर्शनच्या नावाखाली फसवणूक किंवा खंडणी गोळा करण्याचा प्रकार वाढला असून, या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात सेक्सटॉर्शनच्या सुमारे २२९ प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच २००२ लेखी तक्रारी पोलिस ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. अशा फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण १७२ जणांना अटक केली आहे. बहुतेक आरोपी हे परराज्यातील आहेत.
सेक्सटॉर्शनच्या खंडणीला बळी पडल्यास तात्काळ योग्य ती खबरदारी घ्या. पीडितांनी घाबरून जाऊ नये आणि फसवणूक करणा-याशी त्वरित संवाद थांबवावा. अनोळखी व्यक्तींसोबत कधीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. ब्लॅकमेल आणि धमक्यांचे पुरावे जतन करा. एवढेच नव्हे, तर सेक्सटॉर्शनला बळी पडले असल्याची बाब जवळच्या पोलिस ठाण्यात तात्काळ कळवावी. सेक्सटॉर्शनसारख्या प्रकरणाला धैर्याने सामोरे जा, घाबरू नका. कुटुंब आणि जवळच्या मित्रांना घटनेची माहिती द्या आणि त्यांना विश्वासात घ्या, जागरुक करा, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Post Views: 3,435