(गयाना)
‘करो या मरो’च्या तिस-या मुकाबल्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तिसरा टी 20 सामना जिंकणं बंधनकारक होतं. वेस्ट इंडिजने दिलेले १६० धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि १३ चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद ४९ धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक केले. पहिले दोन्ही सामने विंडिजने जिंकले होते.
वेस्ट इंडिजने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पदार्पण करणा-या यशस्वी जयस्वाल याला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जयस्वाल फक्त एक धाव काढून बाद झाला तर शुभमन गिल याला फक्त ६ धावांची खेळी करता आली. गिल आणि जयस्वाल बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडणार की काय? असेच वाटत होते. पण सूर्यकुमार यादव याने सामन्याचे चित्र बदलले. सूर्यकुमार यादव याने ४४ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ४ षटकार आणि दहा चौकार ठोकले.
सूर्यकुमार यादव याने तिलक वर्माच्या साथीने भारताला विजयाकडे नेले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये तिस-या विकेटसाठी ५१ चेंडूत ८७ धावांची भागिदारी झाली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्माने मोर्चा सांभाळला. तिलक वर्माने कर्णधाराला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक आणि तिलक यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागिदारी झाली. तिलक वर्माने नाबाद ४९ धावांची खेळी केली तर हार्दिक पांड्या २० धावांवर नाबाद राहिला. हार्दिक पांड्याने १५ चेंडूत १ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या. तिलक वर्माने ३७ चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून अल्जारी झोसेफ याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. ओबेद मकॉय याला एक विकेट मिळाली. इतर गोलंदाजांची विकेटची पाटी कोरीच राहिली.
दरम्यान, या मालिकेत आता वेस्ट इंडिजने दोन आणि भारताने एक सामना जिंकला आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी वेस्ट इंडिजला मालिका जिंकण्यासाठी एका विजयाची गरज आहे. या मालिकेतील उर्वरित दोन सामने शनिवार आणि रविवारी होणार आहेत.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.