(मुंबई)
एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावर स्वकीयांसह विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत आहेत. मात्र आता त्या शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा होतांना रंगली आहे. तर कायम सक्रीय असणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सेलिब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर आता गेल्या कुठे… असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुषमा अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
नुकत्याच एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना दीपाली सय्यद यांनी सूचक वक्तव्य केले आहे. या सूचक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी स्क्रिनवर येऊन तूतू-मैंमैं करत नाही. ज्यावेळी गरज होती तेव्हा मी ते केले. त्यावेळी सगळ्या गोष्टी मी माझ्या अंगावर घेतल्या. प्रत्येकवेळी स्क्रिनवर येऊन टीका करणे योग्य नाही. आता सुषमा अंधारे सेनेमध्ये आल्यात त्यांना प्रुफ करायचं आहे की, मी सेनेत आले, सेनेत माझे अस्तित्व आहे. मला सेनेत साडेतीन वर्ष झालेत. मी योग्य पद्धतीने काम करत आहे. स्क्रिनवर येऊन टीका करणे म्हणजे सक्रिय आहे असे नाही.
मला दोघेही एकत्र यावं हे वाटतं होतं. या अशा राजकीय परिस्थितीचा कार्यकर्त्यांवर परिणाम होत असतो. सध्या प्रत्येकजण आपापलं मत मांडत प्रत्येक जण आपला गट करत आहेत. हा माझा गट तो तुझा गट असे राजकारणात सुरू आहे. एक दिवस माझाही गट असेल, असेही वक्तव्य सय्यद यांनी केले. शिवसेना कोणाची हे अजून ठरलेले नाही. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि भविष्यात लवकरच तुम्हाला माझी भूमिका कळेलच, असेही त्या म्हणाल्या.