(नवी दिल्ली)
सध्या दिल्लीच्या तुरूंगात असलेला महाठक सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात अज्ञात बाबी उघड करण्याची धमकी दिली आहे. सुकेशने आपल्या विरोधातील माहिती उघड करू नये यासाठी त्याला रोखावे म्हणून जॅकलीनने अलिकडेच न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सुकेशशी संबंधित २०० कोटी रूपयांच्या मनिलॉंडरिंग प्रकरणात आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची मागणीही तिने न्यायालयात केली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार सुकेशने जॅकलीनचे नाव न घेता एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात आपण एका व्यक्तीला एक्स्पोज करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. यासाठी त्या व्यक्तीच्या चॅटस्, स्क्रिनशॉटस् आणि रेकॉर्डिंग्ज उघड करणार आहे. संबंधित व्यक्तीला आपल्या स्पर्धकापेक्षा आघाडी मिळावी म्हणून तिची सोशल मीडियावरील पोहोच वाढवण्यासाठी आपण पैसे दिले होते असा दावाही सुकेशने केल्याचे त्या बातमीत म्हटले आहे.
२०० कोटींच्या मनि लॉंडरिंगबाबत त्याने लिहिले आहे की, जगाला आता खरे, सत्य जाणून घ्यायची वेळ आली आहे. त्याची ही चिठ्ठी जॅकलीनला असलेली अप्रत्यक्ष धमकीच असल्याचे मानले जात असून याच चिठ्ठीवरून तिने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आपल्या विरोधात कोणती चिठ्ठी, अथवा वक्तव्य सुकेशला जारी करू दिले जाऊ नये असे निर्देश देण्यात यावे अशी मागणी तिने केली आहे.
जॅकलीनच्या याचिकेत १५ ऑक्टोबरच्या चिठ्ठीचा हवाला देण्यात आला असून त्यात अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी लिहिल्या असल्याचे म्हटले आहे. माध्यमांनीही या प्रकरणाला व्यापक प्रसिध्दी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. जॅकलीनशी संपर्क प्रस्थापित करण्याचे हेतून सुकेश साक्षीदारांना प्रभावित करण्याचाही प्रयत्न करतो आहे. जॅकलीनला एवढा मानसिक त्रास द्यायचा की त्याचे सत्य लपविण्यासाठी ती मजबूर होऊन जाईल असा त्याचा हेतू असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.