भारत आणि ब्रिटनदरम्यान सुरु होणाऱ्या द्विपक्षीय शिखर संम्मेलनाआधीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये एक अब्ज पौंडची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या गुंतवणुकीच्या माध्यमातून ब्रिटनमधील साडेसहा हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं बोरिस यांनी स्पष्ट केलं. ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचाही समावेश आहे.
ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमधील सर्वाधिक गुंतवणूक सीरमच्या माध्यमातून केली जाणार आहे. सीरमने ब्रिटनमध्ये २४ कोटी पौंड म्हणजेच जवळजवळ अडीच हजार कोटी रुपये गुंतवण्याचा करार केलाय. ब्रिटनमध्ये कंपनीचा लसीकरणासंदर्भातील उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनी येथे नवीन सेल्स ऑफिसही सुरु करणार आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत पत्रकामध्ये माहिती देण्यात आली.“आम्हाला अपेक्षा आहे की येथील सेल्स ऑफिसच्या माध्यमातून आम्ही आमचा उद्योग एक अब्ज डॉलरपर्यंत पोहचवू शकू. या सर्व पैशांची गुंतवणूक ब्रिटनमध्येच केली जाईल. ब्रिटनमध्ये सीरम गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमधून लस निर्मिती, वैद्यकीय चाचण्या, संशोधन आणि लस निर्मितीला फायदा होणार आहे,” असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
लस निर्मिती क्षेत्रामधील सीरम ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.सीरमच्या आदर पुनावाला यांनी या पूर्वीच परदेशामध्ये लस निर्मितीसंदर्भातील भाष्य केलं होतं. सीरमने केलेल्या करारानुसार नवीन उत्पादन घेणारी फॅक्ट्री सुरु कऱण्यात येणार आहे. यापूर्वीच अॅस्ट्राझेनेका या कंपनीने लसींचा पुरवठा कमी प्रमाणत होत असल्याबद्दल सीरमला नोटीस पाठवली होती. सीरमकडून तयार करण्यात येणारी ‘कोव्हिशिल्ड’ ही लस भारताबरोबरच अल्प आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये वितरीत करण्याची कंपनीची योजना आहे. अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सीरमच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’चं उत्पादन घेत आहे.
सीरमने ब्रिटनमध्ये नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोनाचा नेझल लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे. मात्र कंपनीने यासंदर्भातील अधिक तपशील दिलेला नाही. काही दिवसांपूर्वीच अदर पुनावाला यांनी ब्रिटनमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतामध्ये लसींच्या मागणीसाठी मला अनेक नामवंत व्यक्तींचे धमक्या देणारे फोन येत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र त्याचबरोबर पुनावाला यांनी पुण्यातील सीरमच्या फॅक्ट्रीमध्ये कोव्हिशिल्डचं उत्पादन सुरु राहणार असून आपण लवकरच भारतात परतणार असल्याचंही नंतर सांगितलं होतं.