(मुंबई)
व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील वर्षी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी यावर्षीचे प्रवेश संपल्यानंतर येणाऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या तब्बल २० अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) चे संभाव्य ळापत्रक जाहीर केले आहे. तब्बल पाच लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे दरम्यान होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सर्व सामाईक परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीईटी परीक्षांना मार्च २०२४ पासून सुरूवात होणार आहेत. २० पैकी २ परीक्षा या ऑफलाइन असणार आहेत. इतर सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे रोजी होणार आहे. यंदा २२ दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नियोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना आतापासूनच प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास आणि नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात गेल्या दोन वर्षात बदल झाले होते. आता पूर्वीप्रमाणेच शैक्षणिक वर्ष सुरळीत होत आहे. सर्व सीईटी वेळेत पूर्ण करुन त्यानंतर प्रवेश कॅप फेरी मार्फत प्रवेश प्रक्रियाही नियोजनबद्ध करता येणार आहे.
– महेन्द्र वारभुवन, आयुक्त, सीईटी सेल