( नवी दिल्ली )
पंजाबी गायक सिद्ध मूसेवाला याची हत्या करणारे २ शार्प शूटर्स अमृतसरच्या अटारी सीमेजवळ मारले गेल्याचा दावा स्थानिक आमदार जसविंदर रामदास यांनी केला आहे. एका वाड्यात हे दोन्ही शार्प शूटर्स लपले होते. त्यानंतर पोलिसांनी या वाड्याला चोहोबाजूने घेरून त्यांचे एन्काऊंटर केले. पंजाब पोलिसांनी कंठस्नान घातलेल्या २ शूटर्सपैकी एकाचे नाव जगरूप उर्फ रूपा आणि दुसऱ्याचे मनप्रीत उर्फ मन्नू असल्याचे म्हटले जात आहे. हे दोघेही कुख्यात गैंगस्टर्स आहेत. पोलीस आणि गँगस्टर्समध्ये झालेल्या चकमकीत ३ पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किमी अंतरावर असलेल्या भकना गावात ही चकमक सुमारे ५ तास चालली. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून आम्ही सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांचा पाठलाग करीत होतो. आमच्या टास्क फोर्सला या भागात काही मारेकरी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये गँगस्टर जगरूप सिंह रूपा आणि मन्नू कूसा असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली.