(रत्नागिरी)
सिंधुरत्न समृध्द योजना अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळा आज अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे संपन्न झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि आमदार योगेश कदम उपस्थित होते तर आमदार दिपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, सिंधुदूर्ग चे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता संजय सावंत आदि मान्यवर तसेच रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्हयातील संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲङ अनिल परब म्हणाले दिपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना सिंधूदुर्ग जिल्हयात उत्कृष्टपणे राबविली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सिंधूरत्न या योजनेची माहिती मिळेल. ही योजना तळागळापर्यंत पोहचविणे गरजेच आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी कमी पडू दिली जाणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
खासदार विनायक राऊत म्हणाले सिंधुदूर्ग जिल्हयाबरोबर आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी सदर योजना राबविली जाणार असल्याने रत्नागिरी साठी सुवर्णसंधी मिळाली आहे. ही योजना चांदा ते बांदा या योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत असून रोजगार, आर्थिक उन्नती, वैयक्तीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेतून बांबू लागवड, मत्स्य व्यवसाय, कृषि, बचत गट, कोळंबी उत्पादन केंद्र, रोजगार क्षेत्र, पर्यटन, काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया आदि उद्योगांना अधिक चालना मिळणार आहे.
यावेळी दोन्ही जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांनी या योजनेच्या आराखडयाचे सादरीकरण केले. या योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर यांनी सादरकरणावेळी संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयावंर चर्चा केली.