(सिंधुदुर्ग)
ऐतिहासिक रामेश्वर मंदिर, विस्तीर्ण समुद्र किनारा यामुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या आचरे गावात आता
निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून आचरा देवराई परीसरात श्री मारुती च्या भव्य दिव्य सतरा फूट उंचीची मुर्ती साकारली गेली आहे. या अनोख्या मुर्तीमुळे येथील पर्यटनात एक तुरा खोवला गेल आहे. आचरा देवराई परिसरात बुधवार दि. ४ जानेवारी रोजी श्री मारुती च्या भव्य दिव्य मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल अशी येथील ग्रामस्थांची आशा आहे.
सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर पुरोहितासह सचिन केळकर यांनी पंचगव्याने मूर्तीचे शुद्धीकरण करुन कु. ऋग्वेद सरजोशी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मारुती स्तोत्र पठण करत मूर्तीची स्थापना करण्यात आली. या स्थापना सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी श्री विनीत मिराशी, श्री कपिल गुरव, श्री मुकुंद घाडी, श्री दशरथ घाडी, श्री रमेश पुजारे, श्री गावकर, श्री अरविंद सावंत, श्री आशिष सावंत यांसह श्री जगदीश तावडे, श्री पवन पराडकर आदी उपस्थित होते. सर्व मानकरी यांचा रीवाजाप्रमाणे श्रीफळ, दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विलास मांजरेकर व श्री ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली आहे. त्यांचा श्री निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे श्री मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला.
देवराई परिसरात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. देवराईतील औषधी वनस्पती, देव वृक्ष, नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येक जण बोलून दाखवत होते.