देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नवनवीन आजार समोर येत आहेत. आधी काळी बुरशी (ब्लॅक फंगस) आणि आता पांढरी बुरशी (व्हाईट फंगस) यामुळं अनेकांना प्राण गमवावा लागत आहे. म्युकर मायकोसीस अर्थात ब्लॅक फंगसमुळं अनेकांना आपले डोळे गमवावे लागले. अनेक राज्यात या आजाराला महामारी घोषित करण्यात आलं आहे. त्यात आता मास्क देखील ब्लॅक फंगस आजार पसरविण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं समजतं.
ब्लॅक फंगस होण्याचं प्रमुख कारण म्हणजे अस्वच्छ मास्क होय. वरिष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. एस.एस. लाल यांनी म्हटलं की, अधिक वेळ एकच मास्क परिधान केल्यामुळे ब्लॅक फंगस आजाराचा धोका वाढतो. मास्कवर जमा झालेली घाण कणांमुळं डोळ्यांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. या व्यतिरिक्त मास्क ओलसर असल्यामुळे देखील इन्फेक्शनचा धोका आहे.
डॉ. लाल यांच्यानुसार करोना रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजन लावावा लागतो. यामुळं देखील ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. तसेच रुग्णांना स्टेरॉईडचे हाय डोस देण्यात येतात. यामुळे रुग्णाच्या शुगरचं प्रमाण वाढतं. हाय शुगरमुळं ब्लॅक फंगसची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सरकारने खासगी रुग्णालयातील स्टेरॉईडचा वापर कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ब्लॅक फंगस आजार डोक्यांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात डोळे लाल होण्यापासून होतात. याशिवाय डोळ्यातील पाणी येणं, कंजक्टिवाइटिस सारखी लक्षणं दिसतात. त्यानंतर डोळ्यात वेदना होणे आणि कालांतराने दृष्टीही जाऊ शकते. या आजाराच्या इन्फेक्शची सुरुवात नाकापासून होते. यामुळे नाकातून ब्राऊन वा लाल रंगाचा म्युकस बाहेर निघतो. त्यानंतर हा डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि यानंतर मेंदू आणि नर्व्हस सिस्टमपर्यंत पोहोचल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो.