(पुणे)
पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी बुधवारी घेण्यात येत असलेल्या पात्रता परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. तर प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरीत्या निषेध नोंदवला. शिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच प्रकार घड आहे. परीक्षा कक्षात काही विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खुल्या पध्दतीच्या होत्या, तर काहींना छायांकित देण्यात आल्याने गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर ठिय्या मांडला आहे. २४ डिसेंबर रोजी चक्क राज्य पात्रता परीक्षेतील (सेट) २०१९ च्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर ओढवली होती. आता पुन्हा फेरपरीक्षेची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
छत्रपती राजाराम महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा घेण्यात येते. राज्यभरातील विविध चार शहरांतील पाच परीक्षा केंद्रांवरून १० जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. प्रवेशपूर्व परीक्षा सकाळी १० वाजता सुरू झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात वितरीत करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खुल्या पद्धतीच्या होत्या असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यासह काही विद्यार्थ्यांना छायांकित प्रती देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा केंद्रावर ठिय्या मांडला.
विद्यार्थी-प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय दणाणून सोडले. २४ डिसेंबरच्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर पुन्हा अशा प्रकारामुळे परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील काळातील गैरप्रकार पाहता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबतही नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना, धाराशिवसह जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यांतील विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.