(नाशिक / प्रतिनिधी)
नाशिक (प्रतिनिधी):सामाजिक सद्भावनेतून मानवाला दुःख ,समस्या आणि चिंतामुक्त करा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांनी सेवेकऱ्यांना केले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठात आज (शनिवार दिनांक 19 ऑगस्ट) रोजी साप्ताहिक सत्संग समारोह पार पडला. यावेळी गुरुमाऊलींनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्याना संबोधित केले. आपल्या अमृततुल्य हितगुजामध्ये गुरुमाऊली म्हणाले की, मानवाला घडविणे,त्याला चिंतामुक्त करणे आणि त्याच्या मनातील द्वैत घालविणे हा सेवा मार्गाचा उद्देश आहे.त्याकरिता सक्रिय सेवेकऱ्यानी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून योगदान द्यावे. हे कार्य सर्वांनी मिळून करायचे आहे. त्याकरिता ग्राम अभियान राबविणे आवश्यक आहे. ग्राम अभियानाच्या माध्यमातून समाज बळकट व्हायला मदत होईल. तेव्हा सेवेकऱ्यानी दिवसभरातील थोडा वेळ ग्राम अभियानाला द्यावा अशी आज्ञा गुरुमाऊलींनी केली.
श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्राकडे केवळ कोमल करणी दे रामा,विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा आणि अभेद्य भक्ती दे रामा अशी प्रार्थना केली होती.असे सांगताना गुरुमाऊलींनी देवाकडे काही मागू नका,देव न सांगता देत असतो मात्र आपले आचरण चांगले असावे असा उपदेश केला.
आगामी गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण होणार नाही, सणाचे पावित्र्य सांभाळले जाईल अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा तसेच या काळात पालकांनी आपल्या मुलांकडून गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष यांचे जास्तीत जास्त पठण करून घ्यावे अशी सूचना गुरुमाऊलींनी केली.महावृक्षारोपण अभियानात आज पावेतो 40 लाख रोपांची लागवड झाली असून सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सेवेकऱ्यानी किमान पाच ,पाच झाडे अवश्य लावली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नवीन सेवेकऱ्याला सहज समजेल अशी सोपी सेवा समजावून सांगावी असे ते म्हणाले.
20 ऑगस्ट रोजी ठाणे येथे प्रशिक्षण, 26 ऑगस्ट रोजी मासिक महासत्संग, 27 ऑगस्ट रोजी गुरुपीठात प्रशिक्षण, 28 ऑगस्ट रोजी मुंबई सत्संग समारोह, सप्टेंबरमध्ये पिठापूरमध्ये प्रशिक्षण आणि नोव्हेंबरमध्ये मराठवाड्यात पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा मेळावा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे, श्री. नितीनभाऊ मोरे, श्री. आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.