(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुखपासुन जवळच असलेल्या निवे बुद्रुक गावातील तरूणांनी एकत्र येवून १८ वर्षांपूर्वी युवा गणेश मंडळाची स्थापना करत गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी समाजजागृती, एकजुट, संघटन या हेतुने गणेशोत्सवाची परंपरा सुरु केली. त्याची जपणूक युवा गणेश मंडळ करत आहे. सामाजिक बांधिलकी जपत गावातील जेष्ठांचा सन्मान राखत जनजागृती आणि लोकोपयोगी उपक्रम या मंडळातर्फे राबवले जात आहेत.
यंदा वैभव गावणकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारीणी सदस्य अशा ४० ते ५० युवकांनी पुढाकार घेवून गणेशोत्सवाची तयारी केली आहे. निव्याचा राजा ही गणेशमूर्ती भाऊ खेडेकर व किशोर खेडेकर यांनी साकारली आहे. यंदा दत्त महिमा हा देखावा उभारण्यात आला आहे. तसेच भारताला भूषणावह ठरलेल्या चांद्रयान-३ ची प्रतिकृती उभारुन शास्त्रज्ञांना अभिवादन केले आहे. यंदाही रक्तदान शिबीर आयोजित केले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम उत्सवाच्या कालावधीत घेण्यात आले. या गणेशोत्सवाला आमदार, खासदार, मंत्री हजेरी लावुन युवकांचे कौतुक करतात. आजुबाजुच्या गावातील भजनी मंडळांना व्यासपीठ देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याचे या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ्य आहे. ग्रामीण भागातील कलाकारांसाठी हा उपक्रम राबवला जातो.
युवा गणेश मित्रमंडळाचे उपक्रम
शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत नेणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आयोजित केली आहेत. पर्यावरण रक्षण, स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, प्लास्टिक मुक्ती, बेरोजगारी दूर करण्यात पुढाकार अशी कामे युवा गणेश मित्रमंडळाकडुन केली जात आहेत. या उपक्रमांची जिल्हास्तरावर दखल घेतली असून अनेक पुरस्कारही या मंडळाला मिळाले आहेत.