( रत्नागिरी / प्रतिनिधी )
गणेशोत्सवासाठी मुंबईकरांचे कोकणात आगमन सुरू झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांसाठी वेरळ येथील अनमोल हॉटेल तर्फे मोफत चहा-बिस्कीटची सोय करण्यात आली आहे.
गणेश भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अनमोल हॉटेलचे मालक अनिरुद्ध कांबळे, अनमोल कांबळे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. १४ सप्टेंबर पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे नागरिक याचा लाभ घेत आहेत. या सेवेत ते कोणाकडूनही आर्थिक अथवा इतर साहित्याची मदत घेत नाहीत सर्व खर्च ते स्वतः करीत आहेत.
कोरोना काळात रुग्णांना मदत करणे असो किंवा चिपळूण, महाड येथील पूरग्रस्तांना मदत या प्रत्येकवेळी अनिरुद्ध कांबळे यांनी आपले सामाजिक योगदान दिले आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे व इतर भागातून चाकरमानी रत्नागिरी सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. महामार्गावरून येणाऱ्या या प्रवाशांना वेरळ येथील अनमोल हॉटेलमध्ये गेल्या चार दिवसांपासून मोफत चहा नाष्ट्याची सोय केली आहे. अनमोल हॉटेलच्या माध्यमातून प्रवाशांसाठी दिवसरात्र ही सुविधा उपलब्ध करून देऊन मालक अनिरुद्ध कांबळे यांनी खऱ्या अर्थाने आपल्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे. चाकरमानी गणेश भक्त महामार्गावरील वेरळ या ठिकाणी थांबून हॉटेलमध्ये चहा-बिस्कीटचा लाभ घेऊन हॉटेल मालकांना व कर्मचाऱ्यांना विशेष धन्यवाद देखील देत आहेत.