(खेड)
शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन जनसुनावणी खेड येथील पंचायत समिती मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शक सोसायटी मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री.शरद शहाजी भोसले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर शासनाच्या सामाजिक अंकेक्षण प्रदर्शकता मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई DRP यांचे प्रतिनिधी श्री.जयदेव रांजणकर, गटशिक्षणाधिकारी श्री.श्रीधर शिवण, सुनावणी समिती सदस्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.सुनील तांबे उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, कुपोषणता कमी होऊन सशक्त भारत घडावा व यातून शाळेचा शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता सुधारावी या उद्देशाने राष्ट्रीय व राज्यस्तरावरून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली.या योजनेत मध्यान्ह भोजनासोबतच इयत्ता १ ली ते ८ वीच्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना सकस पोषणासाठी पूरक आहार देखील दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागात होते की नाही? याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन सोसायटीमार्फत या योजनेचे प्रत्यक्ष पाहणी करून सोशल ऑडिट केले जात आहे. प्रत्यक्ष ही योजना कशी चालते? कशा पद्धतीने तिची अंमलबजावणी सुरू आहे? याची पाहणी शासनामार्फत करण्यात आली. या तपासणी दरम्यान प्रत्यक्ष योजना राबवत असताना आढळून आलेल्या त्रुटींचे निवारण व पूर्तता कशा प्रकारे करण्यात आली आहे.याबाबतची शालेय पोषण आहार योजनेची खेड तालुक्यातील पहिली जनसुनावणी घेण्यात आली.
या जनसुनावणी दरम्यान खेड तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी श्री.पाटोळे, श्री.महबूब फकीर शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक श्री.हर्षल घाडगे यांचे सह तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा प्रतिनिधीक स्वरूपात एकूण २२ शाळांचे मुख्याध्यापक,पोषण आहाराचे काम पाहणारे शिक्षक, संबंधित गावातील सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य,शालेय पोषण आहार शिजवून देणारे सदस्य,त्यांचे मदतनीस,अंगणवाडी सेविका, पालक व काही विद्यार्थी उपस्थित होते.
जनसुनावणी दरम्यान सोशल ऑडिटद्वारे शालेय पोषण आहार रेकॉर्ड,चव रजिस्टर,मदतनीस करार,फिटनेस प्रमाणपत्र, मानधन,किचन शेड स्थिती, हॅन्डवॉश स्टेशन,योजनेचे माहिती फलक,लोगो फलक,लाभार्थी विद्यार्थी संख्या,तक्रारपेटी, आपत्कालीन नंबर फलक , अग्निशमन यंत्र अद्ययावतता, स्वच्छतागृह स्थिती याबाबत सोशल ऑडिट झालेल्या शाळांना केलेल्या सूचनांची शाळांनी केलेली पूर्तता याची प्रत्यक्ष पुराव्याद्वारे पाहणी करून त्याची खातरजमा करून प्रकरणे जनसुनावणी पॅनलचे अध्यक्ष श्री.शरद भोसले व त्याचे सदस्य यांनी या सुनावणी दरम्यान निकालात काढली.दरम्यान आढळलेल्या काही त्रुटींची पूर्तता सात दिवसात गटशिक्षणाधिकारी शिगवण यांचे मार्फत शासन स्तरावर सादर करण्याचे सुचित केले. काही त्रुटी शासन स्तरावर अंमलबजा- वणीसाठी प्रस्तावित करण्यात आल्या. शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना या योजनेत जाणवणाऱ्या त्रुटी बाबत सुधारणा करण्याच्या दृष्टीने मदतनीस मानधनात सुधारणा, कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये अंमलबजावणी करत असताना येणाऱ्या समस्या, नियमित व सातत्याने पोषण आहार धान्य पुरवठा करण्याची गरज व अन्य बाबींबाबत सुनावणी दरम्यान मांडलेल्या मतांच्या आधारे शासन स्तरावर काही आवश्यक बदल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी सामाजिक अंकेक्षण व मूल्यमापन सोसायटी महाराष्ट्र शासन मंत्रालय,मुंबई यांचे सदस्य श्री.जयदेव रांजणकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.महबूब फकीर यांनी जनसुनावणी समिती अध्यक्ष, पॅनल सदस्य व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून ही जनसुनावणी पूर्ण झाली.