( रत्नागिरी )
आरोग्य हितासाठी पिण्याच्या पाण्याचा शुद्ध, स्वच्छ, सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच पुरवठा होणार्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सातत्याने उत्तम कामगिरी बजावणार्या गावांना रुपेरी तसेच सुवर्ण मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. ही योजना जल शुध्दीकरणात विशेषतः साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणार्या गावांच्या सन्मानार्थ राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना शुद्ध व स्वच्छ तसेच सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा तसेच पुरवठा होणार्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतो. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग व पाणी व स्वच्छता विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने अंमलबजावणी केली जाते. सलग पाच वर्षे ज्या गावांना हिरवे कार्ड मिळाले आहे व पाच वर्षे संबंधित गावांमध्ये पाण्यामुळे पसरणार्या साथीच्या रोगाचा उद्रेक झाला नसेल, अशा गावांना रुपेरी मानपत्र देण्यात येणार आहे.
या योजनेत वर्षातून जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे आरोग्य विभागामार्फत दोनदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये स्त्रोतांचे व्यवस्थापनामध्ये जे दोष आढळून येतात त्यांचे निराकरण करून संभाव्य साथीस प्रतिबंध करता येतो. या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त निकषांनुसार गावांना हिरवे, पिवळे, लाल गुणांक देण्यात येतात. या सर्वेक्षणात जास्तीत जास्त पाचवेळा हिरवे गुणांक मिळविणार्या गावांना रुपेरी मानपत्र देण्यात येणार आहे.
रुपेरी मानपत्र मिळविण्यात हॅट्ट्रीक केल्यानंतर गावांना सुवर्ण मानपत्रांनी गौरविण्यात येणार आहे. यासाठी रुपेरी मानपत्र मिळवण्यासाठी कामगिरी तीनदा केल्यानंतर या गावांना सुवर्ण मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.