(चिपळूण)
घरे आणि शाळांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश करून सहा गुन्हे उघडकीस आणले. टोळीने चिपळूणमध्येही चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. संशयितांकडून पोलिसांनी साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात दुचाकी सापडली आहे. ती त्यांनी चिपळूणमधून चोरल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.
अमर बापूसाहेब देकगुडे (वय २६), शशांक दीपक जाधक (२१, दोघेही रा. खोकडवाडी, जि. सातारा), संतोष श्यामराव सोनटक्के (२५, रा. भांडकली, ता. माण), विनोद निवृत्ती खरात (२५, रा. नवीन एमआयडीसी, सातारा, मूळ रा. भालकडी, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की सातारा जिल्ह्यातील वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिस संशयितांची माहिती घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीचे साहित्य विक्रीसाठी काही संशयित दहिवडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक गस्तीवर असताना टेम्पो व कारमधून आलेल्यांची चौकशी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनांची तपासणी केली असता त्यात साहित्य आढळले.
पोलिसांनी विचारणा केल्यावर ते चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वाहने जप्त केली. वाहनांमध्ये जनरेटर, फ्रीज, कॉम्प्युटर, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मूर्ती, पिठाची चक्की, उसाचे गुऱ्हाळ, दुचाकी असा १० लाख ४५ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.