(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भडकंबा येथील तरूणावर तलवारीने वार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या प्रकरणानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. हल्लेखोरांना अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटले होते. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी दिवसभर साखरपा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
भडकंबा येथील सागर महेश वैद्य (24 वर्षे) या तरूणावर तलवारीने हल्ला झाला. यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमी सागर याला उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोंडगाव येथे दोन दिवसांपुर्वी कबड्डी स्पर्धां भरवण्यात आल्या होत्या. यावेळी वाद झाला होता. मात्र हा वाद मिटविण्यात आला. मात्र हल्ला करणाऱ्यांनी तो राग मनात धरून सागर याच्यावर तलवारीने हल्ला केल्याचे समजते. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने तीव्र पडसाद बुधवारी साखरपा परिसरात उमटले. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंडगाव बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदवला. जमावाने आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करत पोलीसांना घेराव घातला.
सोळा तास उलटून गेले तरी आरोपींना अटक का करण्यात आली नाही असा संतप्त सवाल जनतेने केला. साखरपा पांकोशीतील जनता गप्प राहणार नाही, असा इशारा जमावाने दिला. या घटनेमुळे साखरपा परिसरातील वातावरण तंग झाले होते. पोलीस दलाकडून जादा कुमक मागविण्यात आली होती. संपुर्ण साखरपा बाजारपेठेत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक मारूती जगताप, देवरूखो पोलीस निरीक्षक पदीप पोवार, संगमेश्वरो सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण देशमुख उपस्थित होते.
साखरपा येथील घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गंभीर दाखल घेतली असून “आरोपींना लवकर अटक करण्यात येईल. कायदा कोणी हातात घेऊ नये”, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या सगळ्या प्रकरणी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी साखरपा दुरुक्षेत्राला घेराव घालत “जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाहीत”, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.