(संगमेश्वर / प्रतिनिधी)
साखरपा प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या एसटी बसला बोलेरो गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा (ता. संगमेश्वर ) येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ शुक्रवारी (२३ जून) सकाळी १०:१५ वाजण्याच्या दरम्यान झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विकास नामदेव गुरव (३५, रा. मळगे, ता. शाहूवाडी) है आपल्या ताब्यातील इचलकरंजी रत्नागिरी बस (एमएच १४ बीटी ३४०७) घेऊन जात होते. साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ प्रवासी उतरण्यासाठी बस थांबली होती. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या बोलेरो (एमएच ११. एडब्लू ०७७४) गाडीने बसच्या पाठीमागून धडक दिली. ही गाडी जगदीश लोकाप्पा अंगडी (४७, रा. विशाळगड ता. शाहूवाडी) हा चालवत होता.
या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी साखरपा पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.