( देवरूख / वार्ताहर )
संगमेश्वर तालुक्यातील साखरकोंड येथे रेल्वेच्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द महिलेला मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी घडली. सुभद्रा तुकाराम शितप असे वृध्द महिलेचे नाव आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुभद्रा शितप या शनिवारी सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी शेतातील काम आटोपून त्या रेल्वे ट्रॅक चालत घरी येत होत्या. रत्नागिरीहून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या रेल्वेची शितप यांना धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद शनिवारी रात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शितप यांच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडताना अथवा जवळून चालताना ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.