(शिर्डी)
शिर्डीच्या साईबाबांचे व्हीआयपी दर्शन आरती घेणाऱ्या साईभक्तांना आता साई संस्थानने मोबाईल क्रमांक व आधार किंवा मतदान कार्ड आयडी क्रमांकांची सक्ती केली आहे. भाविकांच्या मोबाईलवर संस्थानने पाठविलेला संदेशाची खात्री केल्याशिवाय दर्शन आरती मिळणार नसल्याने मोबाईल व आधार किंवा मतदान कार्ड क्रमांकाची सक्ती केली असून ही अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, काही एजंट दर्शन आरती पासचा काळा बाजार करीत असल्याच्या तक्रारी साई संस्थानकडे आल्या आहेत. काही प्रकरणाची चौकशी करून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी अशा रितीची योजना साई संस्थान राबवित आहे.
साईबाबा संस्थानला जे साईभक्त दान देतात, त्या दानाच्या टप्पे करून त्यांना साई संस्थानच्या वतीने दर्शन आणि आरती देण्यात येत असते. यासाठी संस्थान अशा दानशूर साई भक्तांना एक युनिक आयडी कार्ड देण्याचे प्रस्तावित केले आहे. असे असले तरी दानशूर भक्तांनी ऑनलाईन दर्शन व आरती आरक्षित करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे समाधी व मूर्तीवर वस्त्र चढविण्यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने वस्त्र काढली जातात. यामध्ये देणगीदार यांना देखील वस्त्र चढविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.