(संगमेश्वर)
ग्रामीण भागातील कलाकारांवर विविध पैलू पाडत त्यांच्यातील अचूक कलागूण ओळखून त्यांना दिशा देणे हे अभिनंदनीय कार्य आहे. यासाठी अथक प्रयत्न करणारे कोकणातील सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री कला महाविद्यालय म्हणजे युवा कलाकारांना घडविणारे एक कला विद्यापीठ असून सह्याद्री मधील विद्यार्थ्यांची कला हिमालयाची उंची गाठणारी असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावर्डे ता. चिपळूण येथे बोलतांना केले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात काल चिपळूण सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी सह्याद्री कला महाविद्यालयातील कलादालन आणि युवा कलाकारांनी घडविलेल्या शिल्पाकृती पाहिल्या. येथील कलाकारांच्या बोटात अक्षरशः जादू आहे. या कलाकृती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी घडविल्या आहेत यावर विश्वास बसत नसल्याचे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले. शिल्पकला विभागाच्या अनिकेत बोंबले याने घडविलेल्या कुस्तीतील ‘धोबीपछाड’ या शिल्पाचे त्यांनी विशेष कौतूक केले आणि अशा प्रकारचे शिल्प मुंबईत असायला हवे अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी दिली. सह्याद्री कला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ युवा कलाकारांनी उभारलेल्या चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या १५ फूट रुंद आणि २५ फूट उंच मोझॅक कलाकृतीचे कौतूक करुन ही कलाकृती उभारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप देत यासर्व कलाकारांसोबत आदित्य ठाकरे यांनी छायाचित्र देखील काढायला लावले. सह्याद्री मधील युवा कलाकारांसह मान्यवर कलाकारांच्या कलाकृती आदित्य ठाकरे यांनी अत्यंत बारकाईने पाहून आपण मंत्रमुग्ध झाल्याचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांना यावेळी सांगितले.
सह्याद्री कला महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सविस्तर माहिती देवून राबविण्यात येणाऱ्या कलाविषयक उपक्रमांबाबत मंत्रीमहोदयांना अवगत केले. यावेळी कला महाविद्यालयातर्फे आदित्य ठाकरे यांना प्रणय फराटे यानेरेखाटलेली कर्णेश्वर मंदिराची एक कलाकृती भेट देण्यात आली . सर्व मान्यवरांचे प्रारंभी आमदार शेखर निकम यांनी स्वागत केले . यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब आमदार , राजन साळवी, विक्रांत जाधव आदि उपस्थित होते.