(रत्नागिरी/प्रतिनिधी)
जयगड ग्रामपंचायतीच्या सरपंच फरजाना डांगे यांनी आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विवेक सुर्वे यांनी जयगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना वाटद जि. प. गट या नावाचा व्हाट्सअप ग्रुप असून या ग्रुपवर श्री. फरजाना अस्लम डांगे यांनी धार्मिक सलोख्यास व सौहार्दास बाधा निर्माण होईल अशी एक पोस्ट दिनांक 26 मार्च रोजी टाकली आहे. या पोस्टमुळे समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वास्तविक कुठल्याही धर्माबद्दल व्देषभावना फैलावणारा मजकूर जाणून बुजून सोशल मिडीयाव्दारे अन्य कुठल्याही माध्यमाव्दारे पसरवणे हा गंभीर अपराध आहे. तसेच या फॉरवर्डेड ( forwarded ) व्हाट्सअप पोस्टचा उगम कुठून झाला आहे यावर सुद्धा प्रकाश टाकणे गरजेचे आहे, जेणेकरून त्याला कडक शासन होईल व अशा घातक प्रवृत्तींना लगाम बसेल.
जयगड परिसरात सर्वधर्मीय बांधव कित्येक वर्षे गोडीगुलाबीने व सौहार्दपूर्ण वातावरणात वास्तव्य करीत आहेत. सर्व बांधवांमध्ये सलोख्याचे वातावरण आहे. परस्परांच्या धर्माबद्दल प्रेम आपुलकीची भावना वृद्धिंगत झालेली आहे. परंतु काही व्यक्तींकडून या शांततापूर्ण वातावरणाला बाधा आणण्याचे, जातीय सलोखा बिघडवण्याचे काम चालू असल्याचे दिसून येत आहे. तरी आपण या झाल्या प्रकाराची शहानिशा करून संबंधितांवर प्रचलित भारतीय कायद्यानुसार जरब बसेल अशी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विवेक सुर्वे यांनी केली आहे.