(मुंबई)
वन विभागातील बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसत आहेत. या खात्याचे प्रमुख परदेशात गेले आहेत. हे प्रमुख परदेशात जाणे आणि या विभागाच्या बातम्या येणे हा संशोधनाचा भाग आहे. लाखो रुपये देऊन पदावर आलेले अधिकारी प्रामाणिकपणे कसे काम करू शकतील, परंतु अधिकाऱ्यांच्या बदलींचे रेट ठरविले जात आहे. असा खळबळजनक दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता जोवर बदलत नाही, तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही, असे ते मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट ३ लाख रूपये आहे, असं प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलं आहे. लाखो-कोट्यावधी रूपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसं करू शकतील? शासन आपल्या दारी नेलं काय किंवा शासन आणखी कुठं नेलं तरी शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय उपयोग नाही. शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणुक आहे, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, राज्यकर्त्यांकडून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी पाहायला मिळत आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. याच्या जाहिरातींमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. या जाहिरातबाजीमध्ये शासनाने न घेतलेले निर्णय दाखवून राज्यातील जनतेची फसवणूक करण्याचा उद्योग राज्यकर्त्यांकडून सुरु आहे, योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ बंद केला जाईल, असे सांगून जाहिरातबाजीसाठी गर्दी जमवली जाते, असा थेट आरोप अजित पवारांनी केला.