(संगमेश्वर / प्रतिनिधी)
गेले काही दिवस मुसळधार पावसाने माखजन परिसराला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या जोरदार पाण्यामुळे सरंद जाधववाडी येथील ओढ्यावर असणारा लोखंडी साकव तुटून वाहून गेल्याने अनेक वाड्यांचा तसेच आंबव गावचा संपर्क तुटला आहे. यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गाची गैरसोय होणार आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य श्रीधर फणसे यांच्या प्रयत्नाने हा लोखंडी साकव बांधण्यात आला होता. या साकवाचा उपयोग संगमेश्वर तालुक्यातील सरंद आणि आंबव गावातील लोकांना तसेच विद्यार्थ्यांना होत होता. साकव बांधून अनेक वर्षे झाल्याने या साकवाची दुरुस्ती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक जाधव यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केला.
मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. जोरदार पावसामुळे ओढ्याला भरपूर पाणी आल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे साकव तुटला. यामुळे ग्रामस्थांचे हाल होणार आहेत.