(रत्नागिरी)
समुद्री शेवाळ संवर्धन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात नुकताच सुरू करण्यात आला आहे. काळबादेवी आणि गोळप येथे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. काळबादेवी, गोळप, मिर्या, भाट्ये तसेच काळबादेवी या चार समुद्रकिनार्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजने अंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पातून उत्पादित होणार्या शेवाळ उत्पादनातून कॉस्मॅटिक आणि जेली चॉकलेट तयार केली जाणार आहेत. प्रकल्पातून 200 स्थानिक महिलांच्या हाताला रोजगारही उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पहिला तर देशातील दुसरा क्रमाकांचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
हा प्रकल्प काही कालावधीत पूर्णत्वाला जाणार असून या माध्यमातून आणखीन शेकडो हातांना काम मिळणार आहे. या अंतर्गत ‘कप्पा पिकस’ या जातीचे शेवाळाचे उत्पादन आता काळबादेवी आणि मिर्या या ठिकाणी घेतले जात आहे. या पासून कॉस्मॅटिक, जेली चॉकलेट उत्पादन होणार आहे. तर खत म्हणूनही याचा वापर केला जाणार असल्याचेही डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.
लोकसंचलित साधन केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत जिल्हा आर्थिक विकास महामंडळाने या संदभांतील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. यासाठी समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर , सहाय्यक अमरिश मेस्त्री यांना मत्स्य महाविद्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, इंडियन अॅग्रिकल्चर रिसर्च इन्सिट्यूट कोची व मत्स्य महाविद्यालय, आयसीएआर अंतर्गत सीएमएफआरआय यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे. केंद्रीय समुद्र मत्स्य संशोधन मुंबई यांनी यासाठी रत्नागिरी येऊन स्थानिक 200 महिलांना प्रशिक्षण दिले.