(मुंबई)
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर सध्या ऑनलाईन गेमला प्रमोट करणाऱ्या जाहिरातींमध्ये दिसत आहे. सचिनने या जाहिराती करणे न थांबवल्यास आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. कडू यांनी सचिनला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
याबाबत बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहिरात केली आहे. त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होत आहे. या ऑनलाइन गेममुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. काही मुलांनी आत्महत्या केल्या. सचिन भारतरत्न आहेत. त्यामुळे त्यांनी ती जाहिरात मागे घ्यावी. त्याचबरोबर ऑनलाइन गेमच्या विरोधात वक्तव्य करावे, असे आमचे मत आहे.
बच्चू कडू असेही म्हणाले की, ‘ आम्ही सचिनच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. भारतीयांची या ऑनलाईन गेमपासून मु्क्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. आम्ही नेहमी हटके स्टाईलने आंदोलन करतो. यावेळीही आमचे आंदोलन हटके असेल. लोक सुपारी देतात आम्ही नारळ देऊ. केवळ जाहिरातच नाही, तर ऑनलाईन गेमच बंद करावे, अशीही विनंती सरकारला करू.