(गणपतीपुळे / वैभव पवार)
भारतीय संविधानाने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या विचार सूत्रात गुंतून देशाला समृद्धीच्या उंच शिखरावर नेले आहे .तेच संविधान बदलण्याची भाषा आज केली जात आहे .हा धोका ओळखून समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी संविधान वादी, विवेकवादी विचारसरणीच्या सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक समतामुलुख समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागरूकतेने एक संघ होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, इंदूमिल आंदोलनाचे प्रणेते आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
रत्नागिरी येथे सविधान बचाव यात्रेचे स्वागत बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात व लक्षणीय उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या संविधान बचाव यात्रेच्या मार्गदर्शनपर जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंदराज आंबेडकर बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, इंदूमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली 24 ऑक्टोबर 2023 पासून लोकशाही मार्गाने दीक्षाभूमी नागपूर येथून संविधान बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली ही संविधान बचाव यात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्हे फिरली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे फिरून या यात्रेचा समारोप समारोप ६ डिसेंबर 2023 रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे होणार आहे.
त्यापूर्वी ही संविधांन बचाव यात्रा 29 नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत दाखल झाली. या संविधान बचाव यात्रेच्या जाहीर सभेचे आयोजन बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज जवळच्या कर्लेकर मळा येथील बौद्धजन पंचायत समितीच्या प्रशस्त जागेत करण्यात आले होते. यावेळी या सभेला रत्नागिरी बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस नरेंद्र आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, माजी अध्यक्ष तु. गो. सावंत, रविकांत पवार,विलास कांबळे,बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद-खंडाळा अध्यक्ष भाई जाधव, सभापती रजत पवार आदींसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या संविधान बचाव यात्रेच्या प्रारंभी बौद्धजन पंचायत समितीच्या नाचणे रोड कर्लेकर मळा येथील प्रशस्त जागेत असलेल्या नवीन विहिरीचे उद्घाटन तथा लोकार्पण आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले. ही विहीर बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष तु. गो. सावंत गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चून स्वखर्चाने बांधून दिली आहे या उद्घाटन तथा लोकार्पण सोहळ्याला प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या संविधान बचाव यात्रेच्या जाहीर सभेत प्रारंभी विचारपिठावरील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गंध दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संविधान बचाव यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक सर सेनानी आनंदराज आंबेडकर आणि संविधान यात्रेचे नेतृत्व करणारे समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांचा मोठा पुष्पहार घालून बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरीच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. तसेच रत्नागिरीतील विविध संस्था, संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधी व गाव शाखांच्या वतीने सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांचे आदरपूर्वक व श्रद्धापूर्वक स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या संविधान बचाव यात्रा जाहीर सभेमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सर्वप्रथम तु. गो. सावंत गुरुजी व त्यांच्या कुटुंबीयांचे विहिरीच्या कामासाठी दिलेल्या दातृत्वाबद्दल विशेष कौतुक केले.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी सांगितले की, भारतीय संविधान टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होण्याची गरज आहे. आज जे जे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहे ते संविधानाचे उपकार आहेत आणि म्हणून ते संविधान लक्षात घेऊन आपण देखील आपली जबाबदारी समजून संविधान टिकवले पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे देश एक संघ आहे तसेच बाबासाहेबांचे विचारच वैचारिक क्रांती घडवू शकतात अशा विविध प्रकारे त्यांनी संविधानाबद्दल भाष्य केले. तसेच त्यांनी म्हटले की, संविधान कितीही चांगले असो, ते राबिवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान किती वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला इशारा लक्षात घेणे गरजेचे आहे अशा भारतीय संविधानाद्वारे लोकशाहीची देशांमध्ये रुजवणूक होताना राष्ट्रहित समाजहित समोर ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर बोलताना सांगितले की मराठा नेत्यांना माझे सांगणे आहे की, आपण मराठा समाजासाठी आरक्षण मागताना कुणबी समाजाचे आरक्षण न घेता मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण घेणे गरजेचे आहे. तशाप्रकारे आमची देखील मागणी आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या याचा सारासार विचार करावा असे प्रतिपादन त्यांनी केले
या सभेला मोठ्या प्रमाणात रत्नागिरी तालुक्यातील बौद्धजन पंचायत समितीच्या गावशाखांचे प्रमुख पदाधिकारी व सभासद बंधु भगिनी उपस्थित होते यावेळी या सर्वांचेच कौतुक आनंदराज आंबेडकर यांनी केले. या जाहीर सभेत संविधान बचाव यात्रेचे नेतृत्व करणारे समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, सध्या या देशात भारतीय संविधानाला धोका पोहोचविण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जात आहे. त्याचे उदाहरण म्हणून देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महिलेला बसविण्यात आले. परंतु देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करताना त्या महिलेला करू न देता पंतप्रधानांनी केले. एकूणच त्या राष्ट्रपती महिलेच्या ताब्यात तिन्ही सैन्यदले असताना घटनेला धोका देण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जात आहे. तसेच सद्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या आदिवासी असल्याने त्यांच्या आदिवासी समाजाच्या मतांचा वापर करून घेण्यासाठी राज्यकर्त्यांकडून त्यांना राष्ट्रपती पदी बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच या देशात लोकशाही बदलण्याचे काम होत असून हुकूमशाही आणली जात आहे. त्यामुळे देश वाचवायचा असेल तर ईव्हीएम मशीनही नाकारली पाहिजे. पूर्वीची शिक्का मारून मतदान करण्याची पद्धत सध्या लोकांनी अवलंबली पाहिजे तशी ठाम भूमिका लोकांना घ्यायलाही लावली पाहिजे जेणेकरून संविधाना वाचवता येईल. त्यासाठी संविधान बचाव यात्रेचा रथ त्यासाठीच आम्ही येथे आणला आहे असे त्यांनी सांगितले. या रथयात्रेचे चांगल्या प्रकारे स्वागत केल्याबद्दल त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले तसेच समता सैनिक दलाच्या सर्व टीमचे विशेष कौतुक त्यांनी करताना आपण देखील बाबासाहेबांच्या त्या काळात लहान असताना लहान असताना घेतलेला अनुभव त्यांनी कथन केला. यावेळी सावंत गुरुजींनी पाण्याच्या विहिरीसाठी केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. काकासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित सर्वच बंधु भगिनींना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर या जाहीर सभेत उपस्थित सर्वांचे जाहीर आभार बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी मानले.
या जाहीर सभेचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार गुरुजी यांनी केले. या जाहीर सभेला बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व गावशाखांचा लाभलेला उत्फुर्त प्रतिसाद पाहून संविधान संविधान बचाव यात्रेसाठी आलेल्या सर्वच मान्यवरांनी खूप मोठे समाधान व्यक्त केले .तसेच तसेच रत्नागिरीतील संविधान बचाव यात्रेच्या यशस्वी नियोजनाबद्दल बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.