(मुंबई)
रामनवमीच्या मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांमध्ये झालेला राडा या भाजपचा पूर्वनियोजित कट होता. छत्रपती संभाजी नगर येथे मध्यरात्री राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली. यामुळे येथील तणावपूर्ण झाले होते. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली. किराडपुरा भागात राम मंदिर आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम असल्याने गैरप्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी दोन गट समोरासमोर आले होते.
यापूर्वी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून भाजपने हा कट रचला आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड व खासदार इम्तियाज जलील यांनी हे घडवून आणले आहे. याचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असून एमआयएम भाजपची बी टीम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हे भागवत कराड व इम्तियाज जलील यांचे प्लानिंग होते. तसेच या घटनेचे मास्टरमाईंड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले की, रामनवमीच्या रात्री संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुदैवी आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून राजकीय नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून परिस्थिती बिघडवू नये. पोलीस आपली कामगिरी चोख बजावत आहेत.
घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरे तर अशा तणावपूर्ण स्थितीत कसे वागावे हे नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे. अशा कोणीही परिस्थितीत चुकीची वक्तव्ये करत असतील तर कृपया त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. सर्वांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत राहील, हे पाहणे सर्वांची जबाबदारी आहे. अशा स्थितीतही कुणी याला राजकीय रंग देण्याच प्रयत्न करत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काही नाही. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, विरोधी नेत्यांचे आरोप म्हणजे त्यांची राजकीय बुद्धी किती छोटी आहे हे दिसते. काही नेते जाणीवपूर्वक आपल्या स्वार्थासाठी राजकीय वक्तव्ये करत आहेत. त्यांनी हा प्रकार तात्काळ बंद करावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये यापुढे कुठेही कुणीही गडबड, गोंधळ करू नये. दंगेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल