(सांगली)
मी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ द्या. निवडणूक आयोगाला फक्त मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शिव्या घालत आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा फक्त कागदावर आहे. निवडणूक घ्या म्हणजे जनताच ठरवेल की खरी शिवसेना कोणाची आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. शिवगर्जना यात्रेनिमित्त संजय राऊत यांनी सांगली येथे कार्यक्रमात बोलताना आयोगावर आपल्या भाषेत जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन केले, पण या कार्यक्रमातही संजय राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी निवडणूक आयोगासाठी खालच्या भाषेतील शब्द वापरला. शिवसैनिक संघर्ष करणारा आहे. शिवसैनिकाने उपाशी राहून घरची चटणी भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केले आहे. शिवसैनिक येथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिले ते ५० खोके घेऊन पळून गेले आहेत. निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, शिवसेना तुमच्या बापाची आहे का? ही “शिवसेना” निवडणूक आयोगाने निर्माण केली का, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.