( रत्नागिरी /प्रतिनिधी )
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या निकषानुसार २०२३-२४ या वर्षातील स्पर्धा घेण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, स्पर्धेचे वेळापत्रक दिले आहे. यामध्ये ग्रामपंचायत, तालुका जिल्हास्तरावर स्वच्छतेच्या प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा घेऊन ग्रामस्थांना प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यात सहभाग घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
स्वच्छतेच्या या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानाचा दर्जा उंचावण्याचा आहे. या स्पर्धेसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. ग्रामपंचायतस्तर समिती ठरवून १९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर कृती कार्यक्रम निश्चिती करणे, जिल्हा परिषद गटस्तर स्पर्धा व तपासणी २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर, जिल्हा परिषद गटस्तर प्राथमिक तपासणी २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, जिल्हा परिषद गट अंतिम तपासणी ६ ते २१ डिसेंबर, जिल्हास्तर तपासणी २२ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२४ आणि विभागीयस्तर तपासणी ७ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीत होईल. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पारितोषिक दिले जाणार आहे.
जिल्हास्तरावर जिल्हा परिषद गटात प्रथम पारितोषिक ६० हजार रुपये, जिल्हास्तर प्रथम ६ लाख, द्वितीय ४ लाख तर तृतीय ३ लाख रुपये, विभागस्तरावर प्रथम १२ लाख रुपये, द्वितीय ९ लाख, तर तृतीय ७ लाख, राज्यस्तरावर प्रथम ५० लाख रुपये, द्वितीय ३५ लाख रुपये, तृतीय ३० लाख रुपये अशी आहे. त्याचप्रमाणे स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन पुरस्कारात जिल्हास्तर ५० हजार, विभागस्तर ७५ हजार रुपये, राज्यस्तर ३ लाख रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन जिल्हास्तर ५० हजार, विभागस्तर ७५ हजार, राज्यस्तर ३ लाख, स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापन जिल्हास्तर ५० हजार, विभागस्तर ७५ हजार तर राज्यस्तर ३ लाखांचा पुरस्कार आहे.