( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर – रत्नागिरी आणि सातारा या दोन जिह्यांना जोडणा-या संगमेश्वर – पाटण घाटमार्गासाठी संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी आणि पाटण तालुक्यातील जनतेने संगमेश्वर – पाटण घाटमार्ग समन्वय सनितीच्या माध्यमातून उठाव केला असून लोकाभिमुख लोकचळवळ निर्माण केली आहे. या लोकचळवळीत थेट जनतेचा सहभाग असून या लोकचळवळीच्या माध्यमातून चार ही तालु्क्यात सध्या व्यापक सह्यांची मोहीम राबवली जात आहे. या लोकाभिमुख लोकचळवळीला संगमेश्वर – पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी पाठींबा दर्शविला असून या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, राज्याचे उद्याोगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत , उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शेखर निकम सांगितले.
संगमेश्वर – पाटण घाटमार्गाच्या प्राथमिक अहवाल कामासाठी आमदार शेखर निकम यांनी मार्च २०२० च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करुन घेतली होती मार्च २०२१ पर्यंत या कामाचा डीपीआर राज्य सरकारला सादर करणे आवश्यक होते. मात्र मधल्या काळात दिरंगाई झाली त्यामुळे या कामासाठी संगमेश्वर – पाटण घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी लोकचळवळीची घोषणा करत या कामात जनतेला सहभागी होण्याचे आहाहन केले. संतोष येडगे यांच्या लोकचळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने आपला सहभाग या चळवळीत नोंदवला.
संगमेश्वर – पाटण घाटमार्गासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून गाव निहाय बैठका घेवून सह्यांची मोहीम राबवली जात आहे. चार तालुक्यातील नागरिकांच्या संयुक्त सह्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यात येणार असून या कामासाठी लोकप्रतिनीधींनी पुढाकार घ्यावा अशी विनंती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २०२२ रोजी संगमेश्वर व्यापारी संघाने बैठक घेवून संगमेश्वर – पाटण घाटमार्ग लोकचळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेत तेथील पदाधिका-यांनी विभागनिहाय जबाबदा-या स्विकारत सह्या मोहीम राबवत १ व २ नोव्हेंबर या दोन दिवसांत विक्रमी दोन हजार सह्या घेतल्या जनतेची या घाटमार्गाच्या कामाप्रती असलेली तळमळ दिसून आली हा घाटमार्ग विषय मार्गी लागावा म्हणून सातत्याते पाठपुरावा करणार असल्याचे समन्वयक येडगे यांनी सांगितले.