(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुका मनसेच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण अनुपस्थित असल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या आगामी दौऱ्याच्या नियोजनासाठीमनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक देवरुख येथे संपन्न झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याच्या आगामी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यामुळे महाराष्ट्र् सैनिकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी नियोजनाच्या बैठकी जिल्हाभरात सुरू आहेत. नुकतीच मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व संगमेश्वर तालुका सम्पर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे यांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या पदामध्ये झालेल्या फेरबदलातून पदाधिकार्यामध्ये झालेले गैरसमज दूर करण्यासाठी व राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या नियोजनाची एक बैठक पार पडल्याचे समजते.
मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसे देवरुख कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा सचिव संतोष नलावडे ही उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण मात्र या बैठकीला उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाध्यक्ष चव्हाण हे नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत जितेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरीचेबल असल्याचे दिसून आले.