(संगमेश्वर/ प्रतिनिधी )
सध्याची युवा पिढी मोबाईल आणि अन्य सोशल मिडियासह सुखनैव जीवन जगण्याच्या मागे असते असे म्हटले जाते . मात्र सर्वांच्याच बाबतीत हे लागू होत नाही. असंख्य युवक आव्हानात्मक गोष्टी साध्य करुन स्वतःमधील वेगळेपण दाखवून देत असतात. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील चैतन्य अविनाश पाध्ये याने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ३२५० किमी अंतर चालून ‘नर्मदा परिक्रमा’ नुकतीच यशस्वीपणे साध्य केली आहे. गुरुवारी सायंकाळी चैतन्यचे धामणी – गोळवली येथे आगमन होताच ग्रामस्थांनी धामणी गणेश मंदिर ते गोळवली अशी त्याची स्वागत मिरवणूक काढली. एवढ्या छोट्या वयात पायी चालून ‘नर्मदा परिक्रमा’ पूर्ण करणारा चैतन्य हा कोकणातील पहिलाच युवक ठरला आहे.
नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचे विविध प्रकार आहेत. यामधील चालत परिक्रमा करण्याचा प्रकार हा सर्वाधिक आव्हानात्मक मानला जातो. चालत परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आपले ध्येय गाठण्याची जिद्द, त्यागी वृती आणि कमालीची सहनशीलता अंगी असावी लागते. नर्मदा परिक्रमा हा सहज सोपा विषयच नाही. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील अविनाश पाध्ये यांचा मुलगा चैतन्य याने आपले माध्यमिक शिक्षण संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले. दहावीत असतानाच त्याने ‘नर्मदा परिक्रमे’ विषयी वाचले होते. त्याचवेळी त्याने आपण परिक्रमा करायची असा निश्चय केला होता. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन पायी परिक्रमा करायची असे त्याचवेळी मनाशी पक्के केले . कोविड सुरु झाला आणि ही एक संधी मानून चैतन्य आध्यात्माकडे वळला.
कोविड काळात चैतन्यने गुरुचरित्राचे पारायण केले. असंख्य किर्तने ऐकली आणि याच कालावधीत त्याने पायी नर्मदा परिक्रमेचा कालावधी नक्की केला . परिक्रमा केलेले आरवली येथील पाटणकर नावाचे गृहस्थ परिक्रमा करुन आले होते. त्यांच्याकडे जावून परिक्रमेबाबत माहिती घेतली . पाटणकर यांनी परिक्रमा हा स्वतः घ्यायचा अनुभव आहे असे चैतन्यला सांगितल्याने चैतन्यला परिक्रमेबाबत अधिक प्रेरणा मिळाली. नर्मदा परिक्रमेला जायचे म्हणजे आई वडिलांची परवानगी मिळणे अधिक महत्वाचे होते. आमचे घराणे आध्यात्मिक असल्याने आणि सर्वांना नर्मदा परिक्रमेबाबत सर्व माहिती असल्याने चैतन्यला आई वडिलांची परवानगी अगदी सहज मिळाली. अखेर १३ नोव्हेंबर २०२१ रोजी ओंकारेश्वर येथून संकल्प सोडून चैतन्यने परिक्रमेला सुरुवात केली.
दररोज किमान २५ किमी चालायचे आणि जेथे भोजन मिळेल तेथे घ्यायचे , नाही मिळाले तर शिधा स्वतः शिजवून भोजन करायचे असा ढोबळ नियम आपण ठरवला होता . कोणताही कठोर नियम आपण स्वतःला घालून घेतलेला नव्हता. चालता चालता तळ पायाला दहा बारा फोड आले . यावर काय उपाय करायचा हे माहित नसल्याने मी तसाच चालत होतो. मात्र नर्मदा मैय्याला परिक्रमावीयांची काळजी असते. शुलपाणी आश्रमात पोहचल्यानंतर येथे आलेल्या परिक्रमावासीयांमध्ये एक डॉक्टर होते, त्यांनी सुइने हळूवारपणे सर्व फोड फोडले आणि माझे दु:ख हलके झाले. त्यांनीच माझ्या फोडांना तेल लावून माझ्याजवळ सुइ आणि कापूस दिला. पुढील प्रवासात आपण अन्य परिक्रमावासियांच्या पायाला आलेले फोड फोडून दिले.
शुलपाणीच्या जंगलात आता पूर्वी सारखी लूटमार होत नाही . नर्मदा सरोवर प्रकल्पामुळे तेथील आदिवासींची परिस्थिती सुधारली आहे . ते आता परिक्रमावासीयांना सेवा देवू लागलेत ही मोठी आनंदाची बाब आहे. शुलपाणी येथील बहुतांश आश्रम महाराष्ट्रातून चालवले जातात . आश्रमासाठी लागणारे अन्नधान्य आणि साहित्य महाराष्ट्रातून पाठवले जाते . प्रवासा दरम्यान अनेक विस्मयकारक अनुभव आले . आपण कधीही एकटे नसतो हे मैय्याने अनेकदा दाखवून दिल्याची प्रचिती प्रत्येक परिक्रमावासियांना येत असते असे चैतन्यने सांगितले . एकूण ३२५० किमीचा पायी प्रवास करत जवळपास पाच महिन्यांनी २५ एप्रिल २०२२ रोजी चैतन्यची नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण झाली. चैतन्यचे वडिल संगम गणेश मंदिरात गेली अनेक वर्षे पूजारी म्हणून सेवा करत आहेत. आई धनश्री हीने देखील चैतन्यचे धामणी येथे गुरुवारी आगमन होताच आनंदाश्रृनी त्याचे औक्षण करुन आशीर्वाद दिले. आपण केलेली गणेशाची सेवा हीच चैतन्यसाठी मोठी ताकद होती असे मत त्याचे वडिल अविनाश पाध्ये यांनी व्यक्त केले . धामणी ते गोळवली या दरम्यान सायंकाळी वाजतगाजत चैतन्यचे स्वागत करण्यात आले. गोळवली येथे ३ मे रोजी सायंकाळी ६ वा. चैतन्यच्या परिक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे . इच्छुकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.