(देवरुख)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान पदी राहून विविध विकासात्मक योजना आणल्या. याचा लाभ देशातील कोट्यावधी जनतेने घेतला आहे. या केलेल्या कामांची माहिती पुन्हा एकदा जनतेपर्यंत नेण्याचे काम भाजपाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यामध्ये एक महिना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक व भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी तालुक्यातील झालेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली. मोदीजींचे कार्य संपूर्ण जनतेपर्यंत नेण्यासाठी व जनतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३० मे ते ३० जून या कालावधीत भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम योजले गेले आहेत. यात विकास तीर्थ, राष्ट्रीय महामार्ग, पेयजल योजना या प्रामुख्याने मोदीजींनी हाती घेतलेल्या कामांची माहिती नमूद केली.
आगामी काळात बुद्धिवंत संमेलन आयोजित करण्यात आले असून ते २० रोजी शहरातील नृसिंह मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा देखील घेण्यात आला. पक्षातील अकरा आघाडी आहेत व सात विविध मोर्चे यांना एकत्रित करून मेळावा देखील घेण्यात आला. लवकरच व्यापाऱ्यांसाठीचे संमेलन देखील आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे.
“संपर्क से समर्थन” हा कार्यक्रम देखील घेत असताना शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत नेल्या जाणार आहेत. पिक विमा, सौर कृषी पंप, आयुष्यमान भारत योजना, घरकुल योजना, लेक लाडकी योजना या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी घेऊन नऊ वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे हा कार्यक्रम भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. अधटराव यांनी केले आहे. यावेळी भाजपाचे अध्यक्ष सुशांत मुळ्ये, युवा नेते रुपेश कदम उपस्थित होते.