(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर गावात बिबट्याची हत्या झाल्याची माहिती पुढे येत असून याचीच सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना नवरात्रोत्सवा दरम्यान दि. ७रोजी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत वनपाल मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत संगमेश्वर पोलीस तपास करीत असल्याची माहिती दिली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील वाशी हा गाव दुर्गम असून असून सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. या पट्यात वन्य जीवांच्या शिकारी होत असल्याच्या चर्चा सातत्याने होत असते. नवरात्रोत्सवा दरम्यान बिबट्याची शिकार झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत वाशी पंचक्रोशी- दशक्रोशीत बिबट्याची शिकार झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. याच बाबत वन्य सप्ताह निमित्त देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात ही बाब समाजिक कार्यकत्यांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. पण वरिष्ठांनी हि बाब गांर्भियांनी घेतलेली नसल्याने संगमेश्वर पोलिसांना एका निनावी पत्राने खबर दिल्याची चर्चा आहे. दरम्यान संगमेश्वर पोलीसांनी तपास सुरू केला असून पाच संशयिताना ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र संगमेश्वर पोलिसांकडून अधिकृत माहीत मिळू शकलेली नाही.
वन विभागाचे वनपाल तौफिक मुल्ला यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याची हत्या झाली या घटनेला दुजोरा दिला. तसेच याचा तपास संगमेश्वर पोलीस करीत असल्याचे सांगून ही घटना पाच सहा दिवसापूर्वी झाल्याचे सांगितले. मात्र आपल्याकडे याबाबत काहीच नाही असेही सांगितले. मिळालेली माहिती आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया यातून बिबट्याची हत्या झाल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला आहे. मात्र हा दडपण्याचा प्रकार तर नाही ना? असे एक ना अनेक सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी तपास करताना वन विभागाला कळविणे गरजेचे असताना संगमेश्वर पोलिस परस्पर तपास कसा काय करतात असा प्रश्न उपस्थित करून त्याचे हाती काहीच कसे लागले नाही ! तपासात काहीच निष्पन्न होत नाही तर संशयितांना सोडले का? असा सवाल हि जनतेतून विचारला जात आहेत. तसेच कुठल्याही क्षेत्रात प्रसिद्धीसाठी सतत पुढे असणारे व स्वतःला प्राणी मित्र म्हणविणारे सामाजिक कार्यकर्तेही अशावेळी गप्प का…? अशीहीचर्चा सुरू आहे.
जखमी बिबट्याची हत्या झाली असेल तर प्रथम वन विभागाला माहीती देणे गरजेचे होते. मग पोलिसांनाच निनावी पत्राव्दारे माहीती देणेचे नेमके प्रयोजन काय? तसेच अशी अनेक निनावी पत्र पोलिसांसह अनेक खात्यांना मिळतात तेव्हा त्यावर कारवाई होताना दिसत नाही. मग या पत्राचा दखल घेवून एकतर्फी तपास सुरू करताना वन विभागाला अंधारात का ठेवले? जर पोलिसांनी कळविले असेल तर वन विभाग ही आपली जबाबदारी का झटतोय! पोलिसांनी तपास करूनही काहीच हाती लागत नसेल तर ते अपयश कोणाचे? असे सवालही उपस्थित केले जात आहेत.
इतरवेळी आपल्या भागातील अनैतिक धंदे राजरोसपणे चालु असताना दुसऱ्या हद्दीतील अनैतिक धंदेवर धाडी टाकून वरिष्ठ नेमके काय सिद्ध करून पहात आहेत असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही गप्प असलेने त्यांचेबाबतही स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे..