(पाचल / तुषार पाचलकर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री सरस्वती नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी राजापूर तालुक्यातील तळवडे येथील “आरंभ व्यसनमुक्ती साधना” या केंद्राला नुकतीच भेट दिली. समाजात दिवसेंदिवस वाढत जाणारी व्यसनाधीनता व त्यातून बिघडणारी मानसिकता याचा दुष्परिणाम म्ह्णून, समाजात वाढत जाणारी गुन्हेगारी याचा अभ्यास करणे आणि यातून समाज प्रबोधनासाठी योग्य अशी दिशा निवडणे हा या भेटी मागचा हेतू होता असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
व्यसन व व्यसनाधीनता या पासून मुक्ती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या संस्था कसं काम करत आहेत याची उत्तम माहिती पथनाट्यद्वारे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘आरंभ’-व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या व्यसनींसमोर सादर केली. त्याचप्रमाणे व्यसनाधीनतेवर अजून कोणत्या प्रकारे उपचार केले जाऊ शकतात यावर व्यसनी आणि अभ्यासू विद्यार्थी यांच्यात व्यसनाधिनतेच्या वास्तविकतेवर चर्चा घडली.
‘व्यसन’ हा मानसिक व शारीरिक आजार कसा आहे,याची समाजात जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम कसे राबविता येतील याविषयी नर्सिंगचे विद्यार्थी आणि आरंभ संस्था हे वचनबद्ध झाले. आरंभ संस्थेचे संस्थापक श्री. योगेश महादेव गवस यांनी व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचा व शक्य तेवढे सहकार्य करण्याचा यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शब्द दिला.