(गुहागर- उदय दणदणे)
खेड : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आंबवली गावची ग्रामदेवता माता श्रीझोलाई देवीची त्रैवार्षिक यात्रा सोहळा १६ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान होणार असून मुंबई, ठाणे, पुण्यातील भाविक, गावकरी आणि चाकरमानी यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लाकडाची भव्य लाट तरुणांकडून हवेत खेळवण्याचा खेळ आणि त्यानंतर लाट फिरवण्याचा कार्यक्रम हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असते.
आंबवली-वरवलीच्या परिसरातील आठरा गावांमधून येणाऱ्या ग्रामदेवततांच्या पालख्या त्यांच्या आगमन आणि स्वागताची होणारी लगबग हे देखील या यात्रेतील अविस्मरणीय आणि नयनरम्य सोहळा असतो. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या या देवीचा उत्सव याची देही याची डोळा पाहण्यासाठी मुंबईतून शेकडो गावकऱ्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. श्रीझोलाई-सोमजाई यात्रा कमिटी व ग्रामस्थ आंबवली व वरवली हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत. कोकणातील यात्रेचा उत्साह अनुभवणे प्रत्येक कोकणवासीयांसाठी आणि अन्य प्रांतीयांसाठीही एक अनोखी पर्वणी असते.
सध्या कोकणातील त्रैवार्षिक यात्रांची रेलचेल सुरू झाली असून शनिवारपासून आंबवलीच्या श्रीझोलाई देवीची यात्रा सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबवली-वरवली गावाची एकत्रित जत्रा सुरू होणार आहे. श्रीझोलाई आणि सोमजाई या ग्रामदेवतांची ही यात्रा असून यासाठी सर्वच भागातून मोठ्या प्रमाणात गावकरी आंबवलीकडे रवाना होण्यास सुरूवात झाली आहे. या यात्रेची सुरूवात माता श्रीझोलाईच्या परवानगीने सुरू होत असून धार्मिक मान्यतेनुसार पारंपारिक पध्दतीने ही यात्रा आयोजित केली जाते.
पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी लाटेचा खेळ अत्यंत उत्साहवर्धक असतो. तरुणांच्या शक्तीचे आणि देवावरील भक्तीचा अभूतपुर्व सोहळा यानिमित्ताने पहायला मिळतो. सुमारे २२ फुटाहून अधिक लांबीच्या लाकडी लाटेचे गावातील प्रत्येक घराघरामध्ये दर्शन घडवले जाते. लाटेला हवेत खेळवण्याबरोबरच, लाटेच्या रेटारेटीतून शक्ती प्रदर्शनाचाही खेळ यानिमित्ताने खेळला जातो. दोन दिवस आंबवली आणि वरवली गावामध्ये लाट फिरवल्यानंतर ही लाट ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर तयार केलेल्या सारावर (उंच जागेवर) चढवली जाते. यंदा लाटेच्या मिरवणूकीसाठी खेड येथील श्री कृष्ण ढोल ताशा पथकाचेही सादरीकरण होणार आहे.
बुधवार २० मार्च हा दिवस खऱ्या अर्थाने यात्रेचा दिवस असून त्या दिवशी वरवलीतील श्रीसोमजाई देवी आणि महाळुंग्यातील श्रीकेदारनाथ यांची पालखीचे आगमन होणार आहे. ही दोन्ही ग्रामदेवता माता श्रीझोलाईचे बहिण व भाऊ असल्याची येथील मान्यता आहे. त्यांच्या स्वागतासाठी माता श्रीझोलाई वेशीपर्यंत जाते. याचा अर्थ गावकरी या दोन्ही ग्रामदेवतांच्या स्वागतासाठी जातात. त्यानंतर आजुबाजुच्या गावांमधील ग्रामदेवतांच्या पालख्या श्रीझोलाई मंदिरात येतात. प्रत्येक पालख्यांची मंदिरातील स्थान निश्चित केलेले असते. त्याच ठिकाणी देवतांच्या पालख्या स्थानापन्न केल्या जातात. या पालख्यांच्या दर्शनासाठीही असंख्य भाविक मंदिराला भेट देतात. सायंकाळी गावातील देणगीदारांचे स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम केला जातो.
यंदाच्या वर्षी सायंकाळी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार उडवी लावणीचा थरार’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी अखेरच्या दिवशी पालख्याचे पुजन केले जात असून लाट फिरवण्याचा कार्यक्रमाने यात्रेचा समारोप होतो. आंबवली ग्रामस्थ, पुणे व मुंबई समिती या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्थापन करते, अशी माहिती आंबवली ग्राम विकास समिती मुंबई अध्यक्ष राजेश गुरूनाथ यादव (९८७०३२९४९०) यांनी दिली आहे.