(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्री.जाकादेवी देवस्थान खालगावतर्फे देव दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य यात्रेत जिल्हा व परजिल्ह्यातील सुमारे पंधरा हजार भाविकांनी जाकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.
कोरोना कालखंडानंतर यावर्षीची जाकादेवी दिवाळीची यात्रा लक्षवेधी ठरली. या यात्रेमध्ये सुमारे पंधरा हजार भाविकांनी जाकादेवी मातेचे दर्शन घेतले. या यात्रेमध्ये जिल्हा परजिल्ह्यातील अनेक छोटे मोठे विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देवस्थान कमिटी व जाकादेवी येथील प्रसिद्ध डॉ.सुजाता सूर्यगंध यांनी केली.तर राजस्थानी विष्णू समाज यांच्यातर्फे आलेल्या सर्व भाविकांसाठी पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा देण्यात आली होती.भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा खालगाव देवस्थानतर्फे अतिशय चांगल्या प्रकारे पुरवण्यात आल्या होत्या.
दशक्रोशीतील भाविकांना गावोगावी जाण्या-येण्यासाठी रत्नागिरी एस.टी महामंडळातर्फे जादा एस.टी बसेसची सुविधा देण्यात आल्याने श्री.जाकादेवी देवस्थान खालगाव या कमिटीच्यावतीने एसटी महामंडळ, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांचे तसेच राजस्थानी विष्णू समाज, परिसरातील उत्स्फुर्त देणगीदार ,सामाजिक संस्था, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले भाविक,विक्रेते या सर्वांचे जाकादेवी श्री.जाकादेवी देवस्थान खालगाव कमिटी स्थानिक व मुंबई यांच्यावतीने धन्यवाद देण्यात आले.
या उत्सवाची सांगता शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री चांदणे शिंपीत जा या नावाजलेल्या नाट्यप्रयोगाने रात्री उशिरा समाप्ती होणार असल्याची माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली.या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आली आहे.