श्रीलंकेत देशातील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटामुळे सत्ताधारी राजवटीविरुद्धचा हिंसाचार आणि निदर्शने अद्याप सुरूच आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच 76 वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे अधिकार्यांना देशव्यापी संचारबंदी लागू करणे आणि राजधानी कोलंबोत लष्करी तुकड्या तैनात करणे भाग पडले. या हल्ल्यानंतर राजपक्षे समर्थक राजकीय नेत्यांविरुद्ध व्यापक हिंसाचाराला तोंड फुटले आहे.
लोकांच्या एका मोठ्या गटाने कातुनायके विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावर तपासणी नाका उभारला आहे. सत्ताधारी आघाडीच्या निष्ठावंतांना देश सोडून जाण्यापासून रोखण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. महिंदा राजपक्षे, त्यांची पत्नी व कुटुंबीय हे त्यांचे टेंपल ट्रीज हे सरकारी निवासस्थानातून पळून गेले असून, त्यांनी देशाच्या ईशान्य किनार्यावरील त्रिंकोमाली या बंदराच्या शहरातील एका नौदल तळावर आश्रय घेतला आहे. पंतप्रधानांच्या टेंपल ट्रीज या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करणार्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्रभर अश्रुधुराच्या नळकांड्या डागल्या. सुरक्षा दलांनी महिंदा व त्यांच्या कुटुंबाला सरकारी निवासस्थानातून बाहेर काढले. त्या वेळी जमावाला मागे सारण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पुन्हा अश्रुधुराचा मारा केला तसेच ‘वॉर्निंग शॉट’ डागले. टेंपल ट्रीज सोडल्यानंतर महिंदा व त्यांचे काही कुटुंबीय त्रिंकोमाली नौदल तळात असल्याचे वृत्त पसरल्यानंतर या तळाबाहेरही निदर्शने सुरू झाली. सोमवारी निदर्शकांनी राजपक्षे यांचे हंबनटोटा येथील वडिलोपार्जित घर तसेच 14 माजी मंत्री, माजी उपाध्यक्षांसह 18 लोकप्रतिनिधी आणि राजपक्षे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले नेते यांच्या घरांवर हल्ले चढवले होते.
या हिंसाचारात जखमी झालेल्यांची संख्या 249 झाली असून, मृतांची संख्या 8 वर पोहोचली आहे, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. हिंसाचार करणार्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश विमानतळ देण्यात आले आहेत. तसेच नौदल तळाकडे जाणार्या रस्त्यांवर निदर्शक जमा झाल्याने जो कोणी सार्वजनिक मालमत्तेची हानी करताना दिसून येईल, त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत, असे श्रीलंकेच्या संरक्षण खात्याचे प्रवक्ते नलीन हेराथ यांनी दिली.