(कोलंबो)
आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी गुरुवारी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात रंगतदार लढत झाली. कोलंबोमधील प्रेमदासा क्रिकेट स्टेडिअममध्ये झालेल्या थरारक सामन्यात श्रीलंकेने अखेरच्या क्षणी अवघ्या २ चेंडूवर ६ धावा करून शानदार विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली. आता यजमान श्रीलंकेची अंतिम लढत भारतासोबत रंगणार आहे.
या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आल्याने ४२ षटकांचाच सामना खेळवला गेला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४२ षटकांत २५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेने सावध सुरुवात केली. त्यामुळे श्रीलंका सहज विजय प्राप्त करेल, असे वाटत होते. मात्र, मधल्या फळीत एकानंतर एक फलंदाज बाद होत गेल्याने श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागतो की काय, अशी स्थिती झाली होती. अखेरच्या क्षणी तर २ बॉल ६ धावा अशी स्थिती झाली होती. त्यावेळी चरिता असलंका याने सावध फलंदाजी करीत दोनपैकी पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुस-या चेंडूवर दोन धावा करीत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आशिया कपची अंतिम लढत श्रीलंका आणि भारत यांच्यात होणार आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ४२ षटकांत २५२ धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे श्रीलंकेलाही तेवढ्याच षटकांत २५३ धावा काढायच्या होत्या. श्रीलंकेने हे आव्हान पेलत थरारक सामन्यात शानदार विजय मिळविला.